टोपणनाव

काल दुपारी कॅन्टीनमध्ये मित्रांसोबत गप्पा मारतांना जाम मज्जा आली. मित्राला दुपारी फोन आला. त्याने उचलला आणि म्हणाला ‘बोल छुर्या’. बापरे ते नाव एकून माझे आणि माझ्या बाकीच्या मित्रांचे हसणेच थांबेना. त्याला मी म्हटलं अस काय नाव असत का? ‘छुर्या’. मग त्याने त्या नावामागील इतिहास सांगितला. मजेदार होता तो इतिहास. त्याचा मोबाईल माझ्या दुसऱ्या मित्राने घेतला. मग तर काही विचारूच नका. एकाचं नाव ‘काळा’. त्यावर माझा मित्र म्हणाला ‘तो रंगाने खूप काळा आहे म्हणून त्याला गावाकडे सगळे याच नावाने हाका मारतात’. पुढे बघितलं तर, ‘बाजीगर’. आता बाजीगर नाव ह्यासाठी की माझ्या मित्राचे चार मित्र एकाचं मुलीच्या प्रेमात पडले होते. आणि तिला पटवण्यासाठी चौघेही प्रयत्न करत होते. पण ह्याच्या मित्राने नंतर येऊन तिला पटवल. म्हणून त्यावेळी पासून त्या ह्याच्या मित्राला ‘बाजीगर’ असे म्हणायला लागले. काय पण ह्याची फिलॉसॉफी.

शाळेत असतांना माझ्या एका मित्राचे आडनाव ‘गांधी’ होते. त्याला दरवर्षी सगळी वर्गातील मुले दोन आक्टोबरला ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा’ द्यायची. आणि त्यालाही सवय पडून गेली होती. एकाला सर्वजण ‘पहिलवान’ अस म्हणून हाक मारायचे. कारण तो खुपंच सडपातळ होता. शाळेत असतांना एका शिक्षकांना सगळे ‘वेटर’ म्हणायचे. मला सुरवातीला अस का म्हणतात ते कळलंच नाही. पण ज्यावेळी ते वर्गात येतांना पुस्तके उजव्या हातात, जसा हनुमानाने द्रोणागिरी उचलला होता तसे घेऊन येतांना पहिले त्यावेळी समजले. अजून एक शिक्षक होते त्यांना ‘मिठाई’ असे नामकरण झाले होते. आता त्यांच्या डोक्यावरील केसांचा पांढरा रंग आणि मुलायमता बघून त्यांना हे नाव ठेवले हे कळले.

मी संगणकाचा कोर्स करत असतांना माझ्याच विषयातील पाच मुले माझ्या एका मैत्रिणीवर प्रेम करायचे. बर ते पाचहीजण चांगले दोस्त. कुठेही जातांना ग्रुपने जायचे. पण त्या पाचही जणांना ती आवडायची. आणि तिलाही हे माहिती होते. मग काय ती आणि मी त्या पाचजणांना ‘पांडव’ म्हणायचो. आणि ही ‘द्रोपदी’. आणि आमच्या एका शिक्षिकेला ते पाचहीजण फार चांगले वाटायचे. म्हणून मग आम्ही त्या शिक्षिकेला ‘कुंती’ म्हणायचो. आणि त्या पांडवांच्या दृष्टीने मी ‘दुर्योधन’ होतो. कारण ती माझ्या सोबत असायची. आणि त्यामुळे ते माझ्यावर दात खाऊन असायचे. एका मित्राला सर्वजण ‘गाय’ म्हणायचे. आता हे बारस मीच केल होत.  या नावाचा इतिहास असा की, त्यावेळी आमच्या शिक्षिकेने ‘गाईझ!’ असे सर्वांना उद्येशून म्हणाले. आणि त्यावेळी जवळपास सर्वांनाच ‘गाईझ’ शब्द नवीन होता. कोणीच काही उत्तर दिले नाही. पण हाच फ़क़्त ‘या’ असे इंग्लिशमध्ये प्रत्युतर दिले. आणि त्यावेळी पासून ‘गाय’ हे नामकरणही झाले.

एक माझ्या मित्राला ‘आयटीआय’ म्हणायचे. आता तो कुठल्या तरी पॉलीटेक्निकलमध्ये शिकत होता. म्हणून मी त्याला ‘आयटीआय’ म्हणून हाक मारायचो. हे बाकी जाम फेमस झाले होते. एकदा तो वर्गात गैरहजर होता. शिक्षिकेने त्याचे नाव घेऊन का नाही आला अस विचारलं तर वर्गातील सगळीच मुले ‘हा कोण’ असा उलटप्रश्न करायला लागली. असो, एकदा चक्क शिक्षिकेने त्याला ‘आयटीआय’ म्हणून हाक मारली होती.  असेच महाविद्यालयात असतांना एका शिक्षकांना ‘गोंद्या’ म्हणायचे. आता ते का हे मला माहित नाही. पण रोज त्यांच्या तासाला ते शिक्षक येतांना कोणी तरी मोठ्यांनी ‘गोंद्या आला रे आला’ अशी आरोळी द्यायचे. आणि त्या आरोळीने ते शिक्षक वर्गाकडे येत असल्याचे सर्वांना कळायचे. एकदा त्या शिक्षकांना देखील ती आरोळी ऐकू आली होती. मग काय अख्या वर्गाला बोलणे ऐकावे लागले. एकाचे आडनाव ‘दहातोंडे’ आणि मग वर्गातील सर्वच ‘रावण’ म्हणून हाक मारायचे. इथे आल्यावर माझ्या काकाच्या घरासमोर एक मुलगी रहाते. तीच टोपणनाव ‘गुंडी’. आता सगळेच तिला गुंडी म्हणूनचं हाक मारतात. नाव एकून नेहमी हसू येत असते. गावी एक ‘पिंट्या’ नावाचा मुलगा राहतो. त्यावरून त्याच्या बहिणीला सगळे ‘पिंटी’. अरे हो, अजून एक मुलगी आहे तीच टोपणनाव ‘भुंडी’. आता हे नाव का हे मला माहित नाही. तिला तीच्या घरी देखील याच नावाने हाक मारतात. असो, ‘मनी’, ‘बंटी’, ‘चिऊ’, ‘पिंटू’, ‘छकुली’, ‘सुंदराबाई’ ऐकले की जाम हसू येते. एका आजीचे नाव ‘बुटीआक्का’ आणि दुसऱ्या आजीचे ‘मुंगीआजी’. आता ही टोपणनाव अशी का असतात देव जाणे.

Advertisements

4 thoughts on “टोपणनाव

  1. आमच्या गावातही अशीच प्रथा आहे.
    एक आहे भगोना गोईंदा, का तर तो गोट्या खेळताना भगोना (मोठा बाऊल) घेउन यायचा आणि त्यात गोट्या आणायचा, दुसरा आहे कोल्हं गोईंदा, त्याचे कान कोल्ह्यासारखे होते. त्यांना लहानपणी पडलेली ही नावे अजुनही कायम आहेत. इव्हन गावात बारशाला ठेवलेली नावे वापरायचीच नाहीत असा अलिखित नियम आहे. बालु मास्तर, बांडा मारवाडी, वकील हे अजुन काही नमुने. तुमच्या या पोस्टवरुन सहज गावाकडच्या गोष्टी आठवल्या आणि एवढी मोठी प्रतिक्रिया लिहीली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s