पुन्हा विरह

कालचा दिवस इतका मस्त! सकाळी येतांना आईने घरून करून आणलेला फराळ आणला. खर तर फराळाला घरी ये अस तिला म्हणणार होतो. पण हे सांगायची हिम्मत करता करता पुढची दिवाळी यायची. आणि जरी हिम्मत केली असती तर, तिची आणि माझी इतकी कुठे मैत्री आहे? की ती माझ्या म्हणण्यावर येईल. आणि त्यात ती तिच्या घरी गेल्यावर दिवाळी नंतर येणार. त्यामुळे काल मी कंपनीत येतांना फराळ आणला. घरून निघाल्यावर तिला पिंग करू की इमेल हा विचार करण्यात कंपनी आली. मग शेवटी इमेल करू अस ठरवलं. एकटीलाच बोलावले असते तर, तिला शंका यायची. म्हणून सगळ्या मित्रांची नावे आणि तिचे नाव बीसीसी मध्ये टाकून मेल टाकला.

एका मित्राला पकडून डेस्कवर आणला. म्हटलं नाही तर ती विचार करायची की, तिला एकटीलाच इमेल टाकला की काय म्हणून. माझे मित्र सुद्धा ना. तिच्या मैत्रिणीला सुद्धा इमेल टाक म्हणून म्हणत होते. हो हो करून टाळले. तिचा एक मित्र, ज्याच्याशी माझी ओळख आहे. त्याला सुद्धा इमेलमध्ये मार्क केल. माझ्या डेस्कवर एक एक जण येत होते. त्यांच्याशी गप्पा मारण्यात मूड येत नव्हता. ती कधी येते अस झालेलं. शेवटी एकदाची त्या मित्रासोबत आलेली. काल काय दिसत होती यार ती! एकदम ‘अप्सराच’. खूपच गोड आहे ती. ती जस जशी माझ्या डेस्ककडे येत होती. तस तसं माझी धडधड वाढत होती. मला हाय केल्यावर, त्या फराळातील एक करंजी घेतली. तिच्या मित्राने मला ‘तू फराळ केलास का?’ म्हणाला. काय बोलणार? त्याला ‘हो’ म्हटलं. माझ्याकडे पहात राहिला. मग मी म्हटलं ‘काल आई आली , तिने बनवून आणला’. मग तो काय बडबड करीत होता काहीच कळत नव्हते.

ती समोर होती. पण नेहमीप्रमाणे मी तिच्याशी नजर भिडवण्याचे टाळत होतो. नव्हती होत हिम्मत. ती नसेल तर, तिची इच्छा होते. असेल तर तिच्याकडे पाहतो. आणि समोर आली तर, सगळेच ‘अटॅक’ होतात. काहीच करता येत नाही. मी खुर्चीत बसलेलो. आणि ती बाजूला उभी. मग मीसुद्धा उठून उभा राहिलो. ती माझ्या डेस्कवरील मोबाईलकडे पाहून ‘नवीन मोबाईल कुठे आहे?’ अस विचारले. काय बोलणार? पण काहीही असो, तिच्या लक्षात होते की, मी तिच्याशी मोबाईल बद्दल बोललेलं. मी म्हटलं ‘मी वन बीएचके घेतला. त्यामुळे नवीन मोबाईल नाही घेतला’. ती काहीच नाही बोलली. तिचा मित्र मला म्हणाला ‘तुझ्याकडे वन एचके होता ना’. मी ‘हो,  पण आता वन बीएचके घेतला’. मग म्हणाली ‘घरी कोण असते?’. मी मुर्खासारखा ‘मी एकटाच’. काय यार, नंतर लक्षात आले की, कदाचित तिला घरी कोण कोण असते? म्हणजे आई वडील, भाऊ, बहिण बद्दल बोलणार असेल. पण मी विषयच तोडून टाकला.

मला म्हणाली ‘तुम्ही बसा ना’. यार पुन्हा अगदी सुरवातीला भेटल्या प्रमाणे वाटायला लागलेलं. आता कस म्हणू, की ‘तू म्हण ना’. थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. मला म्हणाली ‘तुम्ही बसा, मी गेल्याशिवाय तुम्ही बसणार नाही’. मी म्हटलं ‘तुम्हीही खुर्च्या घ्या’. ती म्हणाली ‘खुर्च्या नाही खुर्ची’. आणि खाली मान निघून गेली. तिच्या मित्राशी थोड्या वेळ गप्पा मारल्यावर तोही गेला. नंतर एक एक जण येत होता. पण माझ्या डेस्कवर झालेल्या तिच्याशी गप्पाच आठवत होत्या. अजूनही तीच डेस्कवर असल्याचा सारखा भास होत आहे. साडेचारच्या आसपास मी पॅंट्रीमधून पाणी घेऊन येत होतो तर तीही पाणी आणायला पॅंट्रीमध्ये निघालेली. ब्रेकआउटच्या बाजूला ती माझ्या समोर आली. पण माझी तिच्याशी नजरेला नजर भिडवायची हिम्मत झाली नाही.

ती माझ्याकडे पाहून ‘टाटा, मी घरी आज चालले’ अस म्हणाली. किती गोड आहे यार ती! इतकी धडधड वाढली ना. आणि ओठांवर ‘का?’ आलेलं माझ्या. पण स्वतःवर कंट्रोल ठेवलं. तिच्याकडे पहिले तर, तिचा चेहरा खुललेला होता. माझी नजरच हटत नव्हती. काय करू यार? ती इतकी छान दिसत होती की.. नाही राहवले. माझ्याकडे पहात पुन्हा ‘घरी चालले’ म्हणाली. आणि मी तिचा खुललेला चेहरा पाहण्यात मग्न झालेलो. आणि त्यात ती पहिल्यांदाच घरी जातांना मला स्वतःहून ‘टाटा’ बोललेली. त्याचा आनंद होत होता. मग काय झाल कुणास ठाऊक, खूपच बेकार वाटलं. आता मला तिची खूपच आठवण येत आहे. वाटलं होते तिला ‘परत कधी येणार?’ अस विचारावं. पण शब्दच फुटेना. मग ती जातांना आणखीनच बेकार वाटायला लागलेलं. नंतर माझा मित्र म्हणाला की, तिला ‘हॅपी दिवाळी’ म्हटलास का तिला. मग लक्षात आले. आम्ही दोघे आज एकमेकांसमोर होतो. पण दोघांच्याही लक्षात आले नाही.

बसमध्ये जाण्यासाठी निघालो तर तिचे दोन मित्र कॅन्टीनमध्ये बसलेले पहिले. आणि तिची बॅगही तिथेच होती. मग त्यांच्याशी दोन पाच मिनिटे बोलत बसलो. पण ती नाही आली. ते ‘हॅपी दिवाळी’चे डोक्यात घोळत होते. बसमध्ये जावून बसल्यावर माझ्या मित्राचा मला फोन आला. मला म्हणाला बाईकवर सोबत जावू. खर तर खूप आनंद झालेला. कारण ती कॅन्टीनमध्ये होती. मी कॅन्टीनमध्ये यायला आणि ती बाहेर जायला एकच वेळ. ती समोर आल्यावर तिने माझी स्टाईल मारली, पाहून मान खाली घालणे. मी तिला पाहून ‘हॅपी दिवाळी’ म्हटलो, आणि ती ‘हॅपी जर्नी’. ती निघून गेली. पण माझ काही चुकल का? म्हणून विचार करण्यात रात्र गेली. आज, तिने पाठवलेले सगळ्या इमेलची पारायणे करीत आहे. असो, आता तिची आठवण खूपच येत आहे.

Advertisements

2 thoughts on “पुन्हा विरह

 1. गाडी सुटली, रुमाल हलले, क्षणात डोळे टचकन् ओले
  गाडी सुटली, पडले चेहरे, क्षण साधाया हसरे झाले
  गाडी सुटली, हातामधुनी हात कापरा तरी सुटेना
  अंतरातली ओली माया तुटूदे म्हटले तरी तुटेना
  का रे इतका लळा लावुनी नंतर मग ही गाडी सुटते
  डोळ्यांदेखत सरकत जाते आठवणींचा ठिपका होते
  गाडी गेली फलाटावरी नि:श्वासांचा कचरा झाला
  गाडी गेली डोळ्यामधल्या निर्धाराचा पारा फुटला

  हे भलते अवघड असते… हे भलते अवघड असते…
  कुणी प्रचंड आवडणारे… ते दूर दूर जाताना…
  डोळ्यांच्या देखत आणि नाहीसे लांब होताना…
  डोळ्यातील अडवून पाणी… हुंदका रोखुनी कंठी…
  तुम्ही केविलवाणे हसता अन् तुम्हास नियती हसते…

  तरी असतो पकडायाचा… हातात रुमाल गुलाबी…
  वार्‍यावर फडकवताना… पाह्यची चालती गाडी…
  ती खिडकीतून बघणारी अन् स्वतः मधे रमलेली…
  गजरा माळावा इतुके… ती सहज अलविदा म्हणते…
  हे भलते अवघड असते… हे भलते अवघड असते…

  तुम्ही म्हणता मनास आता, हा तोडायाचा सेतू…
  इतक्यात म्हणे ती – माझ्या कधी गावा येशील का तू?
  ती सहजच म्हणुनी जाते… मग सहजच हळवी होते…
  गजर्‍यातील दोन कळ्या अन् हलकेच ओंजळीत देते…

  कळते की गेली वेळ… ना आता सुटणे गाठ…
  आपुल्याच मनातील स्वप्ने… घेऊन मिटावी मूठ…
  ही मूठ उघडण्यापूर्वी… चल निघुया पाऊल म्हणते…
  पण पाऊल निघण्यापूर्वी… गाडीच अचानक निघते…

  परतीच्या वाटेवरती गुदमरून जड पायांनी…
  ओठावर शीळ दिवाणी… बेफिकीर पण थरथरती…
  पण क्षण क्षण वाढत असते… अंतर हे तुमच्यामधले…
  मित्रांशी हसतानाही… हे दु:ख चरचरत असते…

  हे भलते अवघड असते….
  (कवि आणि संगीतकार – संदीप खरे, गायक – डॉ. सलील कुलकर्णी)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s