रेशन ते स्टेशन

माझ्या घराजवळील सरकारी ‘रेशन’ दुकानाच्या दुकानदाराला पोलिसांनी मागील महिन्यात पकडले. आता तोच नाही तर पिंपरी चिंचवड मधील अजून दोन सरकारी ‘रेशन’ दुकानदारांना पकडले आहे. ते तिघे ‘रेशन’वरील वस्तू रेशनकार्ड वाल्यांना न विकता बाहेर इतर दुकानदारांना विकायचे. परवा त्या निगडीच्या रेशनकार्डच्या ऑफिसच्या ‘महाराणी’ला पकडले. आता महाराणी यासाठी की तिचा रुबाब तसाच होता. आठवतो का मी रेशनकार्ड काढले तो किस्सा? सोडा, मी सांगतो. बहुतेक, हो! ८ मे २००९ मध्ये मी त्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत तो नवीन रेशनकार्डसाठी फॉर्म भरला. सर्व कागदपत्रांची पूर्तता करून! त्या तिथल्या दोन कर्मचाऱ्यांनी तो व्यवस्थित तपासला. आणि पंधरा जून नंतर या अस सांगितले.

मी जुलै महिन्यात चक्कर मारली तर बोलले, तुमचे काम अजून झालेले नाही. आठवडाभराने या. आठवड्याचे महिने झाले. पण त्यांच्या यादीत काय ‘हेमंत आठल्ये’ काही नाव येईना. मग म्हणाले निगडीच्या रेशनकार्डच्या ऑफिसात जाऊन चौकशी करा. तिथे गेलो तर हेच. सुरवातीला म्हणजे निवडणुकीच्या कामात सर्वजण गुंतले आहेत. तुम्ही निवडणुकी नंतर या. निवडणूक झाल्यावर बोलले आता दिवाळी आली. ‘दिवाळी’नंतर चक्कर मारा. माझ्या ऐवजी माझी आई चौकशीला जायची. आता ह्या रेशनकार्डसाठी कोणती कंपनी मला दर आठवड्याला सुट्टी देणार होती? डिसेंबर उगवला. पण ह्यांचे आपले ‘यादीत नाव पहा, असेल तर बोला नाहीतर पुढच्या आठवड्यात चक्कर मारा’. आईचा रिक्षाने जाण्याचा पंचवीस आणि येण्याचे पंचवीस. पन्नास रुपये आठवड्याचा नाहक खर्च व्हायचा.

मी माझ्या जुन्या म्हणजे याआधीच्या कंपनीत जॉईन होण्याच्या एक दिवस आधी चक्कर टाकली. कारण माझ्याकडे लिव्हिंग प्रुफ नव्हता. वीज होती. पण त्याचे ‘मीटर’ आलेले नव्हते. आणि घराची कागदपत्र कंपनीला नको होती. बर, घर देखील स्वतःचे. त्यामुळे भाडेपट्टी, पत्र वगैरे कोण देणार? म्हणून म्हटलं रेशनकार्डच काम झाल तर ते प्रुफ म्हणून देता येईल. ६ डिसेंबर २००९ला त्या रेशनकार्डच्या ऑफिसात गेलो. जत्राच भरलेली. यादीत नाव पाहिले तर नव्हते. तिथल्या एका कर्मचाऱ्याला विचारायला गेलो तर, तो ऐकून न ऐकल्या प्रमाणे करीत होता. त्याच्या बाजूच्या एका बाईला विचारले तर ती अंगावर पाल पडल्याप्रमाणे खेकसली. जाम भीती वाटलेली. पुन्हा यादीत नाव आहे का ते चेक केले पण यादीत नाव नव्हते. शेवटी पुन्हा त्या कर्मचारी बाईकडे जावून विचारले. तर जणू मी काही लाख दोन लाखाची रक्कम मागितल्या प्रमाणे माझ्याकडे पाहायला लागली. मला म्हणाली की, ‘तुमच्या एकट्याचेच काम नाही आमच्याकडे. यादीत नाव नसेल तर मी काय करू? पुढच्या आठवड्यात या. एकदा सांगितलेलं कळत नाही का?’. काय बोलणार त्या महिषासुर मर्दिनीला.

तिचा तो आवाज पाहूनच चिडीचूप झालो होतो. थोडा मागे सरकलो. कारण गर्दी, आणि रेटारेटी चालू होती. थोडा वेळ बाजूला उभा राहून तिथ काय चालेलेलं ते पहात होतो. सगळ्यांना ती कर्मचारी बाई तसेच उलट सुलट बोलून हाकलायची. कोणाचेच काम होत नव्हते. मग माझ्यातील ‘राज ठाकरे’ जागा झाला. पुन्हा तिला जावून विचारलं की, पुढच्याही आठवड्यात अस घडल तर काय?. ती पुन्हा तेच ‘समजत नाही का वगैरे’. तिला म्हटलं सहा महिने झाले. सगळे कागदपत्र देऊन सुद्धा कामाला इतका वेळ कसा लागतो?. तर म्हणाली, मला काय माहित?. तिला गोडीत सांगितले की उद्या मला नव्या कंपनीत प्रुफ म्हणून हवे आहे. नाहीतर, जॉबचा प्रॉब्लेम होईल. तर ती उलट ‘मग मी काय करू?’. तिला म्हटलं नेमका प्रॉब्लेम कुठे आहे? तर बाजूच्या अर्जांच्या यादीत पाहत बोलली, तुमचा अर्ज सापडतच नाही.

मी अर्जाबद्दल विचारल्यावर माझ्यावर पुन्हा खेकसत, मी तुमचा अर्ज घेतला नाही. ज्याने घेतला त्याला जावून विचार. मग काय डोक आधीच ते सर्व पाहून भडकलेल. तिला म्हटलं, ठीक आहे. माझ्या जॉबचा प्रॉब्लेम झाला तर मी तुमच्या जॉबला प्रॉब्लेम करील. मला म्हणाली, जे करायचे ते कर. काही फरक पडत नाही. तिला म्हटलं, ठीक आहे. खाली जावून शंभर रुपयाचे रॉकेल आणतो. मग कुणाचाच अर्ज सापडणार नाही. बरच फर्निचर आहे. आणि कागदे सुद्धा. पुढचे पुढे.. जाऊ द्या यार..

मी तेच तेच काय उगाळत बसलो आहे. मग काय एका मिनिटात अर्ज सापडला. त्यावेळी त्या महाराणीची ‘सही’ राहिले वगैरे बोलू लागले. माझ पाहून तिथले बाजूचे लोक त्यावेळी मग हळू हळू तिच्यावर चिडू लागले. असो, तो वाढता राग पाहूनच मग माझी काम झटपट झाली.

ती महाराणी त्या निगडीच्या ऑफिसात दुपारी दोनला यायची आणि तीन साडे-तीनला छु. बऱ्याच लोकांचे खूप छोटे छोटे प्रश्न या अशा गोष्टींमुळे अडकून पडलेले. परवा तिने केलेली अफरातफर पोलिसांसमोर मान्य केली. तस त्या पुरवठा मंत्रीने बरेच प्रयत्न केले. पण शेवटी ह्यांनीच गुन्हा कबुल केला. वीस रुपये किलोची साखर ह्या सरकारी ‘रेशन’ दुकानदारांना आठ रुपये दिवाळीची सवलत मिळालेली. म्हणजे बारा रुपये किलो दराची साखर ह्यांनी बाहेर अठ्ठावीस रुपये दराने विकली. आणि लोकांना सांगितलं की मालच शिल्लक नाही. बर किती विकली तर काहीतर दीड एक टन. ह्या क्रेझी फोरने मिळून नऊ रुपये नऊ पैसे प्रती लिटर दराचे रॉकेल तीस रुपये दराने. ते सुद्धा हजार लिटरच्या पटीत आहे.

असो, एकूणच कोटीत घोटाळा झालेला. पण अजूनही त्यांची बाजू घ्यायला अनेक कर्मचाऱ्यांची लिंक आहे. कारण मालाची यादी असलेली फाईल ते कर्मचारी पोलिसांना देत नाही आहेत. ते क्रेझी फोर, म्हणजे ती महाराणी आणि ते तिघे दुकानदार थोड्याच आता जामिनावर बाहेर येतील आणि केस देखील दडपून टाकली जाईल. यावर मला विश्वास आहे. बाकी फार काही बोलायला नको, सर्वजण सुज्ञ आहेत. रेशन ते पोलीस स्टेशनचा प्रवास आता घडला आहे. पाहुयात, अजून काय होते ते! अरे हो! माझ्या अभिनंदनाबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.

Advertisements

2 thoughts on “रेशन ते स्टेशन

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s